मराठी चित्रपट, नाटक, संगीत, टेलिव्हिजन यांची माहिती देणारं अग्रगण्य मराठी संकेतस्थळ. | Change Language: English  | Tuesday, May 21, 2013
मुख्य पृष्ठ - संपर्क
marathimovieworld
 
मुख्यपृष्ठ सिनेवार्ता परीक्षण मुलाखत
नाट्य परीक्षण : सत्ताधीश
'सत्ताधीश'- किस्सा खुर्चीचा Click Here To Read English
राजकरणी व त्यांचे खुर्चीप्रेम सर्वश्रुतच आहे. राजकिय नेता मग तो सत्ताधारी पक्षातील असो वा विरोधी पक्षातील खुर्चीचा मोह त्याला सोडवत नाही. श्री. प्र ल. मयेकर लिखित व विनय आपटे दिग्दर्शित 'सत्ताधीश' हे नवेकोरे नाटक अशाच दोन समांतर राजकारण्यांवर आधारीत आहे.

नाटकाची पार्श्वभूमी ही भारतदेशाच्या व राज्याच्या राजकारणात आजपर्यंत घडून गेलेल्या घटनांशी सादृष्य आहे. त्यात काही काल्पनिक घटनांची भर टाकून हे नाटक उभारण्यात आले आहे.

धनंजय थोरात (डॉ. अमोल कोल्हे) हा सत्ताधारी पक्षातील एक महत्त्वाचा मंत्री. बाबासाहेब घोरपडे या ज्येष्ठ राजकारण्याच्या आशीर्वादाने तरुणपणीच राजकारणात पदार्पण केलेला व लवकरच मंत्रीपदावर पोहोचलेला. तरुण, विवाहित, निर्व्यसनी व सभ्य असलेल्या धनंजयलाही खुर्चीचा लोभ आवरता येत नाही. अनेक राजकिय खेळी खेळून तो आपले स्थान टिकवून ठेवतो, नव्हे अधिक बळकट करतो. या त्याच्या प्रवासात अनिता थोरात (चैत्राली गुप्ते) ही त्याची पत्नी सहभागी असते. अनिता ही नुसतीच एक गृहीणी नसून ती धनंजयची सखी व सल्लागारही असते. धनंजयच्या राजकिय जीवनात घडणार्‍या घटना त्या दोघांच्या चर्चेतून उलगडत जातात व अनिता त्यावर मतप्रदर्शन करतानाही दिसते.

'सनी' हा त्यांच्या महाविद्यालयात शिकणारा मुलगा दूर वसतिगृहात राहतो व फोनद्वारे सतत धनंजयच्या राजकिय निर्णयांबद्दल सवाल करतो.

अभिजीत देसाई (विद्याधर जोशी) हे नाटकातील आणखी एक प्रमुख पात्र. अभिजीत हा धनंजयचा मित्र पण सध्या विरोधी पक्षात असलेला विरोधी पक्षांना एकत्र आणणारे ज्येष्ठ नेते अप्पाजी (ही व्यक्तीरेखा स्वर्गीय जयप्रकाश नारायण यांच्यावर आधारीत असावी) यांच्या खास मर्जीतील आहे. देविका लाड (शीतल क्षीरसागर) ही अभिजीतची चित्रकार मैत्रीण. देविकाचा संदिग्ध भूतकाळ जाणूनही अभिजीत तिच्याशी लग्न करायला तयार आहे. पण राजकारण्यांचे चारित्र्य 'निष्कलंक' असावे या अप्पाजींच्या आग्रहापायी ती दोघे लग्न करु शकत नाहीत.

या प्रमुख पात्रांखेरीज बाबाराव हे मुख्यमंत्री, घोरपडे हे ज्येष्ठ राजकारणी, अप्पाजी दलित कार्यकर्ता वगैरे पात्रे अधून मधून प्रवेश करुन आपापली कैफियत मांडून जातात.

पण मुख्यतः कथा पुढे सरकते मंचावरील दूरदर्शन संचावर वेळोवेळी दिल्या जाणार्‍या बातम्यांमधून. सूत्रधाराचा हा नवा 'अवतार' उल्लेखनीय आहे. दिग्दर्शक विनय आपटे यांनी कल्पकतेने नाटकात अशा अनेक खुबी वापरल्या आहेत. राजकीय विषयांवरील नाटकांच्या दिग्दर्शनातील त्यांचा अनुभव प्रकर्षाने जाणवतो.

मुख्य कलाकार डॉ. अमोल कोल्हे, विद्याधर जोशी, चैत्राली गुप्ते व शीतल क्षीरसागर यांनी आपापल्या भूमिका तन्मयतेने साकारल्या आहेत. चैत्रालीची अभिनयातील व संवादबोलीतील सहजता मनाला भावून जाते. विद्याधर जोशी यांनी राजकारणात पडल्यामुळे मैत्रीणीशी लग्न न करता येण्यामागील अगतिकता समर्थपणे सादर केली आहे. इतर कलाकारांनीही आपल्या भूमिका योग्य तर्‍हेने वठवल्या आहेत. पण त्यामध्ये विशेष उल्लेखनीय आहे ती विलास सावंत यांनी उभी केलेली घोरपडे या ज्येष्ठ राजकारण्याची भूमिका. त्यांचे मोठ्याने बोलणे व भारदस्त आवाज त्या व्यक्तिरेखेला अगदी चपखल बसतो.

नाटकात एकच खटकणारी गोष्ट म्हणजे धनंजयचा मुलगा 'सनी' हा जेव्हा सत्ताधीशांवर अंकुश ठवण्यासाठी विरोधी पक्षात जायचा निर्णय घेतो व त्यासंबंधी चर्चा करण्यासाठी घरी येणार असतो त्यावेळीही हे मुलाचे पात्र व बापलेकांमधील चर्चा नाटकात प्रत्यक्षात दाखविण्यात आली नाही. ती दाखविली असती तर तरुण वर्गाचा राजकारणाबद्दलचा नवा दृष्टीकोन प्रेक्षकांना पाहता आला असता.

एकंदरीत ही राजकीय भट्टी छान जमली आहे. ज्यांना राजकारण व राजकारणी यांच्याबद्दल वाचायला अगर जाणायला आवडते अशा प्रेक्षकांना हे नाटक नक्कीच आवडेल.

सेजल शिर्के © मराठीमुव्हीवर्ल्डसाठी

 
सत्ताधीश'
निर्मिती संस्था:  
लेखक: श्री. प्र ल. मयेकर
दिग्दर्शकः विनय आपटे
नेपथ्य:  
संगीत:  
कलाकार: डॉ. अमोल कोल्हे, चैत्राली गुप्ते, विद्याधर जोशी, बाप्पा जोशी, शीतल क्षीरसागर
 



मुख्यपृष्ठ
I आमच्याविषयी काही I संपर्क I डिस्क्लेमर I प्रायव्हसी पॉलिसी I टर्म्स ऑफ युस I प्रतिक्रिया I जॉब्स
ह्या वेबसाईट संदर्भात मित्रांना सांगा I ऍड टु फेव्हरेटI मेक दिस होमपेज
Marathimovieworld.com support the cause of anti piracy in the music industry.
Marathimovieworld.com do not provide audio downloads or play mp3 music files on this site.
© 2007 - 2011. www.marathimovieworld.com . All Rights Reserved.

-: A Project by :-
Honeybee Media
Honeybee Media Pvt. Ltd.